मराठीतील संख्यानामे

*मराठीतील संख्यानामे*

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकात दोन अंकी संख्यांच्या नामात केलेला बदल सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकवीस, बावीस या ऐवजी वीस एक, वीस दोन अशी पर्यायी संख्यानामे पाठ्यपुस्तकात सुचवली आहेत. अनेक जणांना हा बदल अजब वाटतो आहे. या संख्यानामांतील बदलामुळे मुलांना नेमके काय म्हणायला शिकवायचे या बाबत शिक्षक आणि पालक यांच्यात बराच गोंधळ उडालेला दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर हा बदल का करण्यात आला आहे हे समजून घेणे अगत्याचे ठरेल.

मराठी आणि बऱ्याचशा उत्तर भारतीय भाषांत शंभरपर्यंतच्या संख्यांच्या नावांमध्ये फारशी सुसंगती आढळत नाही. पुढील काही उदाहरणे ही विसंगती लक्षात यायला पुरेशी ठरावीत. एकक स्थानी २ असणाऱ्या या संख्यांची नावे पाहा. बावीस, बत्तीस, बेचाळीस, बहात्तर, ब्याण्णव. बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की एकक स्थानची २ ही संख्या वाचताना आपण बा, बत्, बे, ब, ब्या असे वेगवेगळे उच्चार करतो आहोत. आता जी बाब  दोनाच्या बाबतीत आहे, ती इतरही संख्यांच्या बाबतीत खरी आहे हे सहजच लक्षात येईल. आपण बेचाळीस सारखी संख्या लिहिताना आधी चाळीसातील चार लिहितो आणि नंतर दोन लिहितो. मात्र तीच संख्या  वाचताना आधी दोन (बे) आणि मग चाळीस असे वाचतो. अजून एक बाब म्हणजे एकक स्थानी ९ आला की आपण पुढच्या दशकाचा संदर्भ घेतो. उदाहरणार्थ शेहेचाळीस ,सत्तेचाळीस ,अठ्ठेचाळीस या पुढे येणारी  संख्या मात्र नवचाळीस न राहता एकोणपन्नास होते. एकक स्थानच्या नवाचा हा  नियमही नेहमीच वापरला जातो असे नाही. सत्याण्णव, अठ्ठ्यांण्णव नंतर एकोणशंभर न येता नव्याण्णव येतात!

उत्तर भारतातील भाषांत अशी विसंगती का निर्माण झाली याचे स्पष्टीकरण प्राध्यापक मनोहर राईलकर यांनी त्यांच्या संख्यावाचन या लेखात दिले आहे. या बाबतचे त्यांचे म्हणणे त्यांच्याच शब्दांत समजून घेणे उचित ठरेल.

“संस्कृतमध्ये संख्यावाचनाचा नियम ‘अंकानां वामतो गती’ म्हणजे ‘अंक उजवीकडून डावीकडे वाचावेत’ असा आहे. १४७ ही संख्या ‘सप्तचत्वारिशत् अधिक शतम’ अशी वाचतात. म्हणजे ‘सात चाळीस आणि एकशे’, म्हणूनच मराठीत आपण पाढे म्हणताना ‘सत्तेचाळासे’ असं म्हणत असतो. पण संख्यावाचनाचा हा नियमसुद्धा आपण, म्हणजे मराठीनं धडपणं पाळला आहे, असं दिसत नाही. पाढ्यांव्यतिरिक्त वरील संख्या आपण ‘एकशे सत्तेचाळीस’ अशीच वाचतो. याचा अर्थ, लिहिण्याचा क्रम १-४-७ तर वाचण्याचा क्रम मात्र १-७-४ असा. अधिक मोठ्या संख्यांच्या वाचनात तर हा गोंधळ आणखी प्रकर्षानं जाणवतो. उदा. ३५७४ ह्या संख्येच्या पस्तीसशे चौऱ्याहत्तर अशा वाचनातील अंकांच्या वाचनाचा क्रम ५-३-४-७ असा असल्याचं दिसून येईल. संस्कृतमधून घेतलेली ही ‘वामतो गती’ व्यवहारात आणि प्रत्यक्षात फक्त दोन अंकी संख्यांपुरतीच मर्यादित राहिली असल्याचं आढळून येते.“

*संख्यावाचन, मनोहर राईलकर*
संकलन- राघोजी शेवाळकर

टिप्पण्या