अंकवाचन


उजळणी म्हणताना 'एकावर एक अकरा' असे मुलांना शिकविण्यापूर्वी थोडे थांबा. एकावर एक अकरा म्हणजे काय? गणित शिकविताना असा शिथिलपणा दाखवून आपण मुलांचे आयुष्यभराचे नुकसान करीत आहोत हे लक्षात घ्या. जी गोष्ट नियमाने सिध्द होत नाही तिला गणितात स्थान नाही. 'दहा आणि एक' अकरा असे म्हणायची सवय मुलांना लावा.

एक ते शंभर या संख्यांची नावे व त्यापुढील संख्यांची नावे या दोघांमध्ये एक मूलभूत फरक आहे. तो असा की एक ते शंभर या संख्यांपैकी प्रत्येक संख्येला वेगळे नाव आहे. शंभरपुढील संख्यांची नावे आधीच्या संख्यांचीच नावे पुन्हा वापरुन तयार केली जातात.

एक ते शंभर संख्यांच्या नावांमध्ये गोंधळात पाडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यात आधी एककाच्या नावाचा उच्चार होतो व नंतर दशकाच्या नावाचा उच्चार होतो. उदा. 21 चा उच्चार एकवीस असा होतो. याउलट लिहिताना आधी दशक लिहिला जातो व नंतर एकक लिहिला जातो. हे विद्यार्थ्यांना नीट समजावून दिले नाही तर 'एकावर दोन एकवीस' अशी चुकीची प्रतिमा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होऊ शकते.

स्थानिक किंमत हे नाव न घेता ती संकल्पना मुलांच्या मनात स्पष्ट होऊ दे. चोपन्न म्हणजे पन्नासचार किंवा पन्नास आणि चार हे त्यांच्या मनात पुरते ठसू दे.

एक ते शंभर या संख्यांपैकी प्रत्येक संख्येला वेगळे नाव असले तरीही त्यात विशिष्ट प्रकारची सुसुत्रता आहे. ती शोधून काढण्याआधी आपण 1 ते 100 संख्या व त्यांची नावे लिहून काढू.

टिप्पण्या